दिल्लीत हृदय पिळवटून टाकणारी घटना! अपघातानंतर कारने ४ किमीपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले मुलीचे शव

नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या (New year) पहिल्याच दिवशी दिल्लीत (Delhi Accident) अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. दिल्लीच्या सुल्तानपूर भागात काही युवकांनी एका युवतीच्या स्कूटरला धडक मारली. अपघातानंतर युवकांनी पळ काढली. परंतु यादरम्यान त्या मुलीची बॉडी कारच्या खाली फसली आणि युवकांच्या कारने सुल्तानपूर ते कंझावला, जवळपास ४ किलोमीटरपर्यंत तिला फरफटत नेले. या दुर्घटनेत तिच्या अंगावरील सर्व कपडे फाटले व भरपूर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातस्थळापासून काही मिनिटे दूर युवतीचा रक्तबंबाळ झालेला शव नग्न अवस्थेत (Kanjhawala Accident) सापडला.

माध्यमांतील वृत्तांनुसार, या भयानक अपघाताप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती की, १ जानेवारीच्या पहाटे ३ वाजून २४ मिनिटांनी एक बलेनो कार जी कुटुबगडच्या दिशेने चालली होती, तिच्या खाली एक शव लटकलेला दिसला. पोलिसांना कॉलद्वारे माहिती देणाऱ्या व्यक्तीने कारचा नंबरही सांगितला. परिणामी पोलिसांनी पहाडे ४ वाजून ११ मिनिटांपर्यंत कारला ट्रेस केले. यादरम्यान पीसीआरवरून आणखी एक कॉल आला, ज्याद्वारे कंझावला येथे एका मुलीचा नग्न अवस्थेतील शव रस्त्यांवर पडल्याचे पोलिसांना समजले.

याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या मेडिकल टेस्टनंतर हे आरोपी नशेच्या अवस्थेत कार चालवत असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी आणखी चौकशी करत आहेत.

दरम्यान मृत तरुणी ही २० वर्षांची असून ती दिल्लीत लग्न आणि इतर कार्यक्रमांमध्ये पार्ट टाईम नोकरी करत होती, असे समजत आहे. तिच्या दुर्देवी निधनानंतर तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.