आमच्यात काही मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत, मी राजमार्गावरच आहे – मोरे

पुणे – पुणे शहरातील मनसेचे नेते वसंत मोरे(MNS leader Vasant More from Pune city)  हे पक्षात नाराज असल्याची कुजबुज सुरु असताना आता मोरे यांनी स्वतः माध्यमांच्या समोर आपली भूमिका मांडली आहे. एखाद्या लढाईला एखादा सैनिक नसला म्हणजे कोणी लढाई हरत नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते असे वक्तव्य वसंत मोरे यांनी केले. आमच्यात काही मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. मी राजमार्गावरच आणि राजमार्गावरच राहणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

आमच्या भागात कोणत्याही प्रकारची आरती झाली नाही. मुस्लिम बांधवांनी अजानचा आवाज बंद केला आहे. सकाळची अजान अंतर्गत होते. मी केलेल्या आवाहनाला त्यांनी साथ दिल्याचे मोरे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशमध्ये(Andhra Pradesh)  बालाजीला गेल्यावर कोणत्याही पक्षाचा झेंडा गाडीला ठेवता येत नाही. सगळे खाली काढले जाते. त्यामुळे मी भाड्याने गाडी करुन गेलो. पण गाडीवरचा झेंडा खाली उतरवला नसल्याचे मोरेंनी सांगितले.

मी अस्वस्थ, नाराज नाही. पण मी सध्या शांत आहे. माझी मागच्या चार वर्षात धावपळ झाली आहे. विविध आंदोलने केली आहेत. पक्षाची बांधणीमध्ये मी काम केले. सध्या कुटुंब आणि व्यवसायाकडे लक्ष देत असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. माझ्या प्रभागामध्ये सहा मशिदी आहेत. त्या भागात सर्वांनी नियमांचे पालन केले आहे. मी त्या लोकांना सांगितल्याप्रमाणे ऐकल्याचे मोरे यावेळी म्हणाले.