महाराष्ट्रातील ‘या’ बड्या मंत्र्याची तक्रार करण्यासाठी विक्रांत पाटील यांनी लिहिले थेट राहुल गांधींना पत्र 

मुंबई – राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा , अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली होती.

दरम्यान, आता एक पाऊल पुढे टाकत पाटील यांनी थेट कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सुपुत्राला युवक काँग्रेस निवडणुकांमध्ये निवडून आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावल्याची पोलखोल भारतीय जनता युवा मोर्चा ने केली आहे. महावितरण अधिकारी व कंत्राटदारांवर दबाव टाकून आणि आमिष दाखवून जास्तीत जास्त नोंदणी करण्यासंदर्भात सूचना देण्यात येत आहेत.सरकारी यंत्रणांचा गैर वापर आणि भ्रष्टाचारात लिप्त अशीच निवडणूक पद्धती राहुल गांधी जी आपल्याला अपेक्षित आहे का? हे विचारणारे पत्र राहुल गांधींना पाठविले आहे.

पक्षांतर्गत निवडणुकांना जर इतके भयंकर प्रकार होत असतील तर प्रत्यक्ष इतर महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये राऊत काय पातळी गाठू शकतील याची कल्पना केली जाऊ शकते.पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनीही सरकारी यंत्रणाचा गैरवापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना पदापासून दूर व्हावे लागले होते. नितीन राऊत यांनी केलेला पदाचा गैरवापर आणि आपल्याला अपेक्षित निवडणूक पद्धतीचे काढलेले धिंडवडे यासाठी पक्षाचे वरिष्ठ या नात्याने आपल्याकडून त्यांचा त्वरित राजीनामा घेतला जावा ही मागणी पत्राद्वारे केली आहे.