उघड्यावर नमाज अदा करणे अजिबात सहन केले जाणार नाही- खट्टर

गुडगाव- हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी उघड्यावर नमाज अदा करण्याबाबत केलेल्या घोषणेची सध्या बरीच चर्चा होत आहे. खट्टर यांनी शुक्रवारी सांगितले की, उघड्यावर नमाज अदा करणे अजिबात सहन केले जाणार नाही आणि या समस्येवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी नवीन मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच गुडगावमध्ये ज्या ठिकाणी उघड्यावर नमाजपठण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, त्या मागे घेण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

2018 मध्ये, उघड्यावर नमाज अदा करण्यावरून हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, 37 ओळखल्या गेलेल्या ठिकाणी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून तेथे दर शुक्रवारी हिंदूत्ववादी संघटना उघड्यावर नमाज अदा करण्याविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काही ठिकाणांहून उघड्यावर नमाज पठण करण्याची परवानगी काढून घेण्यात आली होती, मात्र आता मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रत्येक ठिकाणी पुन्हा हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांच्या वक्तव्यादरम्यान मुस्लिम समुदायाला ‘घरांमध्ये नमाज पठण करा आणि उघड्यावर नमाज अदा करून परस्पर संघर्षाला उत्तेजन देऊ नका’ असा सल्लाही दिला आहे. त्यांनी सांगितले की, ‘हा मुद्दाही आपापसात एकत्र बसून ठरवण्यात आला होता आणि काही ठिकाणी प्रार्थनेची परवानगी देण्यात आली होती, जी मागे घेण्यात आली आहे आणि आता पुन्हा चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल. प्रत्येकाला सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि कोणाच्याही अधिकारात कोणीही हस्तक्षेप करू नये. कोणालाही ढवळाढवळ करू दिली जाणार नाही.