दौंड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी जप्त करत आरोपी केला जेरबंद

दौंड – दौंड पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने धडक कारवाई करत मोटरसायकल चोरीतील एक आरोपी जेरबंद केला आहे . या आरोपीकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत . आरोपीने सदरच्या दुचाकी कोंढवा, लोणी काळभोर, दौंड या भागातून चोरल्या असल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे .

या बाबत अधिक माहिती अशी की दि.07/12/2021 रोजी दौंड शहरातील नगर मोरी चौकातून एक दुचाकी चोरी झाले बाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने दौंड डी बी पथक तपास करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेत एक संशयिताला केडगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केलो असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून , त्याचेकडून आत्तापर्यंत चार दुचाकी जप्त करण्यात डी बी पथकाला यश आले आहे.

डी बी पथकाने मिळून आलेल्या इतर दुचाकी बाबत संबंधीत पोलीस ठाण्यांकडे चौकशी केली असता त्या ठिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.सदर आरोपीने आणखी वाहने चोरली आहेत का याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत .

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस हवालदार सुभाष राऊत, पो. ना अमोल गवळी, पो.ना आदेश राऊत, पो.ना आमिर शेख,पो.ना निखिल जाधव,पो.कॉ अमोल देवकाते, पो.ना अभिजित गिरमे यांनी केली आहे . याबाबत अधिक तपास पोलीस नाईक आमिर शेख करीत आहेत.