विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टमधून कमावतो ११.४५ कोटी? स्वत: क्रिकेटरने सांगितल सत्य

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की विराट कोहली (Virat Kohli) इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी 11.45 कोटी रुपये घेतो. आता भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इन्स्टाग्रामवरील कमाईबद्दलची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत कोहलीने लिहिले की, माध्यमांमध्ये माझ्या इंस्टाग्राम पोस्टबद्दल (Virat Kohli Instagram Post) खोटी बातमी सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली इंस्टाग्रामवर पोस्ट टाकण्यासाठी सर्वाधिक शुल्क घेतो. कोहलीला एका पोस्टमधून 11.45 कोटी रुपये मिळतात असे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. या कमाईच्या बाबतीत विराट जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं जात होतं. पहिल्या क्रमांकावर फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि दुसऱ्या क्रमांकावर लिओनेल मेस्सीचा उल्लेख करण्यात आला होता.

मात्र आता विराट कोहलीने या वृत्ताचे खंडन करत हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. “आयुष्यात मला जे काही मिळाले त्याबद्दल मी कृतज्ञ आणि ऋणी आहे, परंतु माझ्या कमाईबद्दल सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातम्या खर्‍या नाहीत,” असे कोहलीने ट्विटरवर लिहिले आहे.