भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण…! चांद्रयान ३ चं यशस्वी प्रक्षेपण

Mumbai – भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान तीन मोहिमेचं प्रक्षेपण आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून करण्यात आले आहे. चांद्रयान तीनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, चंद्रावर अलगद यान उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.

एल व्ही एम 3 या अग्निबाणाच्या सहाय्याने चांद्रयान तीनचं प्रक्षेपण करण्यात आलं. यामध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. 2019च्या चांद्रयान-दोन मोहिमेत सॉफ्टवेअर बिघाडामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर कोसळलं होतं. त्यामुळे आताच्या लँडरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. लँडर चंद्रावर अलगद उतरून तिथलं तापमान, तसंच भोवतालची कंपनं मोजून प्लाझ्मा घनतेचा अंदाज लावणार आहे; तर रोव्हर परिसरातील मूलभूत रचनेबाबत माहिती गोळा करणार आहे.