शेकडो लोकांना कोट्यवधीचा गंडा घालणारा विशाल फटे संध्याकाळी पोलिसांना शरण येणार

बार्शी : अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे (Vishal Phate) याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. फटे हा फरार असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांनी (Police)  विशेष तपास पथक तैनात करण्यात आले आहे. आज अखेर फटे हा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आला. जवळच्या पोलीस ठाण्यात संध्याकाळी हजर होणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

विशाल फटे याने बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे. तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे.

तीन महिन्यात पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींची माया विशालने जमा केली. परंतु, हाच विशाल आता 9 जानेवारीपासून फरार आहे. त्यामुळे आधी श्रीमंत होण्याची स्वप्न दाखणाऱ्या विशालने अनेकांची झोप उडवली आहे.

दहा लाख रूपयांची गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात 6 कोटी रूपये मिळणार असे अमिष विशालने दाखवल्यानंतर 6 कोटी घेण्यासाठी बार्शीत अनेकांनी आपल्या जमीनी विकल्या, फ्लॅटवर लोन काढले. कित्येकांनी सोने गहाण ठेवले. तर काही जणांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन गुंतवणूक केली.

फटेच्या फसवणुकीचा प्रताप केवळ बार्शी तालुक्यापुरता मर्यादित राहिला नसून, इतर तालुक्यांसह राज्यभरातील लोकांच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ७६ जणांनी तक्रार दिली असून, फसवुणकीचा आकडा १८ ते १९ कोटींच्या घरात गेला आहे. मात्र, त्याने राज्यभरात अनेकांना गंडविल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.