दुखवटा असताना जयंत पाटलांकडून पुरस्कार वितरण ! भाजपा नेत्याची कडाडून टीका

मुंबई : भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर केला आहे. तसेच राज्य सरकारने देखील राज्यात दुखवटा दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. मात्र सांगलीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुरस्कार वितरण केले आहेत. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

राज्यात दुखवटा असूनही जयंत पाटील यांनी पुरस्कार वितरण केले आहे. हे अतिशय निंदनीय कृत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने त्यांच्या सन्मानाकरता काही तरी करायला पाहिजे होतं. त्याप्रमाणे काही केलं नाही. कदाचित लता दीदी या सावरकर प्रेमी होत्या. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ पुण्यात हॉस्पिटलचं उद्घाटन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं. त्यामुळे लता मंगेशकर यांच्याबद्दल या सरकारच्या मनामध्ये सल होती, अशी टीका अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.

अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विटर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला सावरकर भक्त असल्याने लतादीदींबद्दल ठाकरे सरकारच्या मनात आकस, असं कॅप्शन दिलं आहे. ते पुढे म्हणाले की, सुरूवातीला केंद्र सरकारने दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. त्यानंतर राज्य सरकारने दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल जयंत पाटील यांनी भारताची माफी मागितली पाहिजे. राज्य सरकारने देखील यासंदर्भात निवेदन दिले पाहिजे.

लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण देशात दुखवटा साजरा करण्यात येत आहे. पश्चिम बंगाल सरकारने सार्वजनिक ठिकाणी येत्या पंधरा दिवस लता दीदींची गाणे वाजतील, असा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रपती भवनावरील तिरंगा देखील लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अर्ध्यावर उतरवला.