विशाल पवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड; येडेवस्ती जिल्हा परिषद शाळेचा एमपीएससीत झेंडा

सचिन आव्हाड/ दौंड – दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील येडे वस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विशाल ठकाजी पवार (Vishal Thakaji Pawar) यांची पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) पदी निवड झाली आहे. या द्विशिक्षकी छोटया शाळेतील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) उत्तीर्ण झालेले ते चौथे विद्यार्थी आहेत. पवार यांनी नुकतेच नाशिक येथे यशस्वीरित्या प्रशिक्षण पुर्ण केले असून त्यांची ठाणे येथे उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

विशाल पवार यांचे येडे वस्ती जिल्हा परिषद शाळा व दौंड महाविद्यालय येथे शिक्षण झाले आहे. पवार हे २०११ मध्ये पुणे शहर पोलिस दलात भरती झाले. भरती झाले तेव्हापासून त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. पहिल्या प्रयत्नात ते एमपीएससीची फौजदार पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पुणे शहर पोलिस दलाच्या बिनतारी संदेश विभागातील नोकरी सांभाळत त्यांनी हे यश मिळविले आहे.

विशाल पवार यांचे बिटकेवाडी (ता. कर्जत) हे मूळ गाव असून गावातील ते पहिले अधिकारी ठरले आहेत. पवार यांना फौजदार संतोष येडे (Faujdar Santosh Yede), शिवाजी ननावरे (Shivaji Nanavare) यांच्यासह पोलिस कर्मचारी अजिनाथ येडे व बाळासाहेब येडे यांचे मार्गदर्शन मिळाले . तसेच कर्मचारी विजय पवार यांचे सहकार्य मिळाले. येडे वस्ती शाळेतील संतोष येडे, सचिन येडे, संदीप येडे हे एमपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. एकाच जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थी एमपीएससी उत्तीर्ण होण्याचा वेगळा बहुमान दौंड तालुक्यातील या शाळेस या निमित्ताने प्राप्त झाला आहे.

आई-वडिलांचे स्वप्न साकार

मी शेतकरी कुटुंबातील असून माझ्यासाठी आई वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. मामा अजिनाथ येडे यांनी माझे शिक्षण केले. मी अधिकारी व्हावे, अशी आई वडिलांची इच्छा होती. आज त्यांचे स्वप्न पुर्ण झाल्याची भावना आहे. पोलिस दलात चांगले काम करण्याची इच्छा आहे, असे विशाल पवार यांनी सांगितले.