शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सहज व सुलभ होण्यासाठीचे नियोजन करा – छगन भुजबळ

नाशिक – शेतकऱ्यांचा खरीप हंगाम (Kharif season) सहज व सुलभ होण्यासाठी कृषी व संबंधित विभागांनी सतर्कतेने नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे(Dadaji Bhuse), आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar), विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, जी. डी. वाघ, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अरूण कदम यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कृषी मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली बांधावर खत व बीयाण्यांचा पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सातत्य ठेवण्यात यावे. बोगस खते व बीयाण्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच वीज वितरण विभागाने कृषीपंपासाठी शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे वीजेचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्यांनी देखील वीज देयके वेळेत अदा होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

खते, बी-बियाणे उपलब्धता आणि नियोजन, बोगस बियाणे, पीकविमा आदी विषयांचा त्यांनी आढावा घेतला. महसूल मंडळनिहाय हवामानाचा अंदाज देणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविण्‍यासाठी प्रयत्न करावेत, या हवामान केंद्रांच्या माध्यमातून बदलत्या हवामानाच्या अंदाजाची माहिती जिल्हापातळीवर एकत्रित करावी. जेणेकरून हवामानातील बदलाचा व नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना योग्यवेळी अंदाज येवून त्यादृष्टीने शेतकरी वर्ग उपाययोजना करू शकतील. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Phule Farmers Debt Relief Scheme), गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (Gopinath Munde Farmers Accident Insurance) योजनेच्या लाभापासून गरजू शेतकरी वंचित राहणार नाहीत, त्यांना आवश्यक प्रसंगी वेळेत कर्जपुरवठा व विमा रक्कम अदा केली जाईल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून कर्जापोटी घेतलेल्या रकमेच्या बदल्यात त्यांची कृषी साधने जमा करू नयेत. पीक कर्जाचा लक्षांक साध्य होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बँकांची बैठक घ्यावी. तसेच कृषी शिक्षण विस्तार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन योजना (New schemes for farmers), पीक पद्धती याबाबत वेळोवळी मार्गदर्शन करण्यात यावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबैठकीत सांगितले.