आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही तर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी हा पर्याय निवडला – सुळे

मुंबई – राज्यात गणपती (Ganapati) आणि अनेक सण होत राहतील, त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून मायबाप जनतेची सेवा करतील असा निरोप व्हॉटस्ॲप मेसेजवरून मिळाला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी बोट ठेवले.घाटकोपर येथे गणपती दर्शन घेत असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार सुळे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते पण दुर्दैव आहे, आजचे जे महाराष्ट्रातील सरकार आहे. ज्या पद्धतीने ओरबाडून… दडपशाही करून… ईडी (ED) वा अन्य केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून, काय ते ५० खोके कानावर ऐकायला मिळते… हे दुर्दैवी आहे अशी खंत सुळे यांनी व्यक्त केली.

सर्वसामान्य माणसांची सेवा करण्यासाठी जे लोक राजकारण व समाजकारणात आले आहेत त्यांना हा काळ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही तर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी हा पर्याय निवडला असल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले. आमच्यासारख्या लोकांना फार अस्वस्थ करणारी पध्दत पैसा, सत्ता, ईडी या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सत्ता ओरबाडून घेतल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून खरंतर सर्वसामान्यांची सेवा करण्याची अपेक्षा होती. मात्र मागच्या अडीच महिन्यात या सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्याचे दिसत नाही असा जोरदार हल्लाबोलही सुळे यांनी शिंदे सरकारवर केला.

राज्यात अडीच महिन्यापासून कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी नवीन सरकारमधील मंत्र्यांकडे वेळ मागितला असता त्यांच्याकडून वेळ मिळत नाही असा आरोपही खासदार सुळे यांनी यावेळी केला.