काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी मोदी सरकारने आठ वर्षांत काय केले? कॉंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली- बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, काँग्रेसने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर केलेल्या भाष्याबद्दल जोरदार निशाणा साधला पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारताना सांगितले की, 1990 मध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांना दहशत आणि रानटीपणाच्या छायेत पळून जावे लागले तेव्हा भाजपचे 85 खासदार ज्यांच्या पाठिंब्यावर केंद्रात व्हीपी सिंह सरकार चालवत होते ते काय करत होते.

सुरजेवाला म्हणाले की, भाजप समर्थित सरकारमध्ये काश्मिरी पंडितांचा छळ होत असताना राजीव गांधींनी आवाज उठवला, मात्र भाजपने या शोकांतिकेला मूक पाठिंबा दिला आणि राजकीय फायद्यासाठी ‘रथयात्रा’ काढली.काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी मोदी सरकारने आठ वर्षांत काय केले? काश्मीरमध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली, हिंसाचार वाढला आणि हजारो काश्मिरींना स्थलांतराला सामोरे जावे लागले. काश्मिरी पंडितांसाठी काही करू शकत नसताना त्यांनी ‘फिल्म’ दाखवायला सुरुवात केली? द्वेषाच्या लागवडीतून नफ्याचे पीक किती दिवस काढणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

यूपीए सरकारच्या 10 वर्षात पंतप्रधान पॅकेजमध्ये 4241 दहशतवादी मारले गेले, काश्मिरी पंडितांना 3000 नोकऱ्या दिल्या गेल्या आणि 5911 ट्रान्झिट हाऊस बनवण्यात आल्याचेही सुरजेवाला म्हणाले. मोदी सरकारच्या आठ वर्षात 1419 दहशतवादी मारले गेले, फक्त 520 लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि 1000 ट्रान्झिट हाऊस बांधली गेली.