मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्या शिवाय पर्याय नाही; पाटणकरांवरील कारवाईनंतर नितेश राणे आक्रमक

मुंबई – ईडीनं मोठी कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीनं थेट ही कारवाई केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.  6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडल्यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हे आज ना उद्या होणारच होते. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर असे छापे पडत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. ईडीने छापा टाकून प्रॉपर्टी जप्त केली असेल तर सरळ सरळ हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पैसे मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत.

त्यामुळे आता मातोश्रीने लोकांना उत्तर द्यावे. सचिन वाझेकडील पैसे कुठे फिरायचे हे आता बाहेर येत आहे. मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्या शिवाय पर्याय नाही. म्हणून आता घरात लपून राहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.