सोनिया आणि राहुल गांधी हे आसाममध्ये आल्यानंतर आम्ही असेच वागलो तर कॉंग्रेसला चालेल का ?

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना भटिंडा विमानतळावरून फिरोजपूरला हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गावर काही शेतकरी आंदोलन करत असल्यामुळे पंतप्रधानांच्या ताफ्याला साधारण 15 ते 20 मिनिटं वाट पाहत थांबावं लागली होती.

त्यानंतर सुरक्षेतील त्रुटी लक्षात आल्यामुळं पंतप्रधानांना नियोजित कार्यक्रम रदद् करून दिल्लीला परत यावं लागलं होतं. या प्रकरणात पंजाब राज्य सरकारकडून पंतप्रधानांना सुरक्षा देण्यात कसूर झाल्याचा ठपका केंद्रीय गृहमंत्रालयानं ठेवला आहे. दरम्यान, पंजाब सरकारवर भाजपच्या नेत्यांची टीकेची झोड उठवली आहे. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांवर देशभरातील भाजप नेत्यांनी निशाणा साधत मोदींसोबत पंजाबमध्ये जे झालं, त्याला कारणीभूत ठरवलंय.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना इशारा दिला आहे. सरमा म्हणाले, मोदींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी काँग्रेसचे सरकार कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा आंदोलकांवर कारवाई करण्यास तयार नाही. एकप्रकारे काँग्रेस अशा प्रकारांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आसाममध्ये आल्यानंतर आम्ही असेच केल्यास? हे काँग्रेसला स्वीकारार्ह असेल का? मात्र ते जर आसाममध्ये आल्यास आम्ही जशास तशी भूमिका घेणार नाही, असे म्हणत सरमा यांनी भाजपच्या संस्कृतीचे दर्शनही घडवले.