काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप जशास तसे उत्तर देणार, फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर संघर्ष होण्याची चिन्हे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र कॉंग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. थोड्याचवेळात काँग्रेसचे कार्यकर्ते फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर जमण्याची शक्यता आहे. या आंदोलनाला भाजपकडून देखील जशास तसे उत्तर दिले जाणार असल्याने मुंबईत राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बंगल्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद केले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. काहीवेळापूर्वीच मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना याठिकाणी येऊ देण्यास मज्जाव करावा, अशी मागणी केली.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्विटरवर त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्यांना नाना पटोले यांना प्रतिआव्हान दिलं आहे. ‘नाना तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. हिंमत असेल तर उद्या सकाळी दहा वाजता येऊनच दाखल. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्हीदेखील भाजपवासी नाही! सागरवर तू ये पाहतो मी तू कसा जातो त’, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. प्रसाद लाड यांनी पटोलेंना इशाराच दिला आहे.