आम्ही हिंदुत्वाचा झेंडा फडकवल्यावर तुम्ही कॅबिनेटमध्ये नामांतराचा निर्णय घेतला – शिंदे 

मुंबई :  संजय शिरसाट नेमकी विचारायचे, साहेब कधी करणार, काय कराचंय, पण मी बोललो बाबा थांब जरा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोरीच्या रणनितीबाबत भाष्य केलंय. सहा महिन्यात चित्र बदलत गेलं. चित्र घातक होत होतं, असं ते म्हणाले. आम्ही खूप प्रयत्न केले होते, पण काहीच झालं नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी  म्हटलंय.

एकनाथ शिंदे (Ekanth Shinde Ravindra Natya Mandir Speech Video Uncut) यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मध्यरात्री पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी रविंद्र नाट्य मंदिरात उपस्थितांनी खचाखच भरलं होतं. आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्त्वाखाली हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमदारांना मिळणारा निधी, संजय राऊत यांवरुनही जोरदार फटकेबाजी केली. तसंच संजय शिरसाट यांचे त्यांनी यावेळी आभारही मानलेत.

राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस सगळीकडेच आमदारकीची तयारी करते, हे आम्हाला लक्षात आलं. पण आमदारांना निधी मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केला. शिवसेना चार नंबरवर गेली. आम्ही हिंदुत्वाचा झेंडा फडकवल्यावर तुम्ही कॅबिनेटमध्ये नामांतराचा निर्णय घेतला, असं म्हणत शिंदेंनी हल्लाबोल केला. शिवसेना वाचवण्यासाठी ही क्रांती आहे असंही ते म्हणाले.