भेट दोन ढाण्या वाघांची; फडणवीस -ठाकरे भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

मुंबई – राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे.अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवलं होते. या पत्रातून राज (Raj Thackeray) यांनी फडणवीसांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. खुद्द फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात राज ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राचा विशेष उल्लेख करत त्यांना फोन करून आभार मानल्याचं सांगितले. त्याचसोबत मी त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचं सांगत त्यातून काही राजकीय अर्थ काढू नका असंही फडणवीसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज ही भेट झाली आहे.

फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यातील मंत्रिमंडळात मनसेचाही समावेश असेल अशा चर्चा सुरू झाल्या. कारण मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्ष निवडीत, बहुमत चाचणी आणि आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला साथ देणार आहे. त्यामुळे मनसे-भाजपा एकत्र येणार असं बोललं जात आहे. राज-फडणवीस यांच्या भेटीने नक्कीच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.