राष्ट्रप्रथम या सूत्राकडे माध्यमविश्वाचे दुर्लक्ष नको, शहजाद पूनावाला यांचे प्रतिपादन

पुणे – समाज माध्यमांच्या प्रभावामुळे माध्यमविश्वाचे लोकशाहीकरण होते आहे. प्रत्येक व्यक्ती माध्यम होत असतानाच्या काळात राष्ट्रप्रथम हे सूत्र नजरेआड होणार नाही, याकडे गांभिर्याने पाहावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shahzad Punavala) यांनी शनिवारी येथे केले.

विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरणप्रसंगी पूनावाला बोलत होते. यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे नगरचे दिव्य मराठीचे ब्युरोचीफ अनिरुद्ध देवचक्के, झी २४ तासचे वरिष्ठ पत्रकार अरुण मेहेत्रे, पुढारीच्या पत्रकार सुषमा नेहरकर आणि सोशल मीडियाकर्मी आशुतोष मुगळीकर यांना पुनावाला यांच्या हस्ते आद्य पत्रकार देवर्षी नारद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. देवर्षी नारद पुरस्कारांचे यंदाचे १२ वे वर्ष आहे.ज्येष्ठ पत्रकार यांना २१ हजार रुपये, तर अन्य तीन पुरस्कार प्रत्येकी ११ हजार रुपये आणि देवर्षी नारद मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. संजय तांबट आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील माध्यमांच्या स्वरूपाचा माध्यमांच्या स्वरूपाचा धांडोळा पूनावाला यांनी घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात माध्यमांनी लोकजागृती आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम केले. स्वदेश व स्वराज्याविषयीची भावना भारतीयांमध्ये प्रकर्षाने रुजवण्याची मोठी कामगिरी त्या माध्यमांनी केली. स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमांचे स्वरूप बदलले. मुठभरांच्या हाती माध्यमविश्वाची सत्ता एकवटत गेली, त्यातून नागरिकांच्या आकांक्षा आणि त्यांच्या समस्यांना माध्यमांत स्थान मिळणे अवघड होऊन गेले. समाज माध्यमे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने माध्यमविश्वाचे लोकशाहीकरण होते आहे.सर्वसामान्य माणूस हा आता माध्यमांच्या केंद्रस्थानी येतो आहे, ही बाब स्वागतार्ह आहे, असे पूनावाला यानी सांगितले.

समाज माध्यमांवर आज कोणीच नियंत्रण ठेवू शकत नाही. सर्वसामान्य माणूस सहजतेने ही माध्यमे वापरत आहे. हे चित्र सकारात्मक असले, तरी त्यातून काही आव्हानेही समाजासमोर उभी ठाकली आहेत. माध्यमांचा सकारात्मक आणि विवेकशील वापर वाढविण्यासाठी समाजातील धुरिणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी सदैव सजगता महत्त्वाची आहे. त्यासाठीच राष्ट्र प्रथम ही भूमिका ठेवून माध्यमे आणि नागरिकांनी माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी पूनावाला यांनी व्यक्त केले.

देवर्षी नारद हे आद्य वृत्तनिवेदक व पत्रकार ठरतात. कारण, ते प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून, परिस्थितीची पूर्ण माहिती घेऊन मगच भाष्य करत. चारित्र्य, संवाद, उत्सुकता, कटिबद्धता, नवनिर्मिती, सभ्यता व संस्कृती ही सात तत्वे त्यांच्या पत्रकारितेची बलस्थाने होती. काळ कितीही पुढे गेला, तंत्रज्ञान कितीही बदलले, तरी ही तत्त्वे चिरस्थायी असल्याने माध्यमकर्मींनी नारदांच्या या तत्त्वांचा अंगीकार करून पत्रकारिता करावी, असे आवाहनही पूनावाला यांनी केले.

यावेळी अभय कुलकर्णी म्हणाले, राजकीय स्वातंत्र्य हे आपण ७५ वर्षांपूर्वी मिळवले आहे पण मानसिक स्वातंत्र्य मिळवणे महत्वाचे आहे. त्याकरिता राष्ट्रीय विचार आवश्यक आहे. शिक्षण आणि माध्यम याद्वारे हे विचार जागृत ठेवण्यासाठी विश्व संवाद केंद्र काम करत आहे.देवर्षी नारद यांना आपण आपल्या संस्कृतीत आद्य पत्रकार मानतो. त्यांच्या नावाने आपण दरवर्षी पुरस्कार देतो. पत्रकार वर्षभर कशाप्रकारे काम करतात आणि ते सकारात्मक पद्धतीने कशा बातम्या देतात यावर आधारित पुरस्कारार्थी यांची निवड विशेष समितीद्वारे केली जाते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची भूमिका स्पष्ट करताना डॉ. शरद कुंटे म्हणाले, १३८ वर्ष संस्था राष्ट्रीय वारसा घेऊन काम करत आहे. ज्या ज्या काळातील आव्हाने आहे, ती योग्य मार्गाने सोडवणे यासाठी काम करण्यात येत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून महविद्यालयामधून राष्ट्रीय विचाराचा प्रसार करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरुणांमध्ये देशभक्ती रुजवण्याचे काम फर्ग्युसन महविद्यालयातून सुरू केले. त्यामुळे त्यांच्या पवित्र स्थळास अनेकजण भेट देतात.देशातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनी फर्ग्युसन मधून शिक्षण घेऊन पुढे यशस्वी वाटचाल केली आहे. राष्ट्रीय शिक्षण आणि स्वत्वाची जाणीव निर्माण करणे यासाठी संस्थेत काम करण्यात येत आहे. समाजातील बेकारी दूर करण्यासाठी नवीन कौशल्य आधारित शिक्षण अभ्यासक्रम राबविण्याचा प्रयत्न होत आहे.

आशुतोष मुगळीवर यावेळी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,सोशल मीडियाच्या आजच्या काळात मोठ्या वेगाने फेक बातम्या पसरत आहेत आणि त्याचा परिणाम समाजावर होत आहे. त्यामुळे सत्याच्या साह्याने या गोष्टी वेळीच रोखण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. समाजातील चुकीच्या गोष्टीवर आपण व्यक्त झाले पाहिजे

ब्रिटिश येण्यापूर्वी आपण विविध जातींची पोषण मूल्ये असलेली पिके घेत होतो. परंतु, आता पोषणमूल्य असलेले विषमुक्त अन्नधान्य शहरी ग्राहक घेतात. शहरी ग्राहकांनीच आता पुढाकार घेत पोषक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्सहित केले पाहिजे. सध्या फॅमिली डॉक्टर नाही, तर फॅमिली फार्मरची गरज आहे, असे नेहरकर यांनी सांगितले.

अनिरुद्ध देवचक्के म्हणाले, आजचा दिवस आनंद आणि भाग्याचा आहे.त्रिवेणी संगम आज जुळून आला आहे कारण, राष्ट्रीय विचाराचा प्रसार करणारे विश्व संवाद केंद्र , विद्यार्थी मन तयार करणारी डेक्कन एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शब्द प्रभू देवर्षी नारद यांच्या नावाने पुरस्कार मिळणे महत्त्वपूर्ण आहे. या पुरस्कारमुळे आमची जबाबदारी वाढली आहे. माझे अहमदनगर मधील सहकारी मित्र आणि पत्रकार यांना पुरस्कार समर्पित करतो.

अरुण मेहेत्रे म्हणाले, मी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले आज त्याच ठिकाणी पुरस्कार मिळणे माझ्यासाठी मोलाचा आहे. आजच्या काळात आमच्यावर पुरस्कार देऊन विश्वास दाखवला गेला आहे. आज वेगळ्या परिस्थिती मधून आपण जात आहे. लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. काम करत असताना कोणत्या विचाराचा, धर्माचा हे महत्वाचे नाही तर प्रामाणिकपणे सत्य मांडणे हेच आवश्यक आहे. त्याप्रकारे काम करणाऱ्याचा हा सन्मान आहे.

वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी दीपा भंडारे यांनी नारद स्तवन सादर केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.