कशी नशीबाने थट्टा मांडली! सॅम करनवर रेकॉर्डब्रेक बोली, तर भाऊ टॉम करन चक्क अनसोल्ड

IPL Auction: आयपीएल २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे पार पडला. या लिलावात सर्व १० फ्रँचायझींनी मिळून सुमारे ४०५ खेळाडूंवर बोली लावल्या. त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे होते. नेहमीप्रमाणे यंदाही लिलावात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. मिनी लिलाव असला तरीही, बऱ्याचशा खेळाडूंवर अनपेक्षित बोली लागल्या.

त्यातही इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) याने सर्व विक्रम मोडले. त्याला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जपासून ते मुंबई इंडियन्सपर्यंत बऱ्याचशा संघांमध्ये जय्यत स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर १८.५० कोटींच्या विक्रमतोड बोलीसह पंबाज किंग्जने त्याला विकत घेतले आणि तो लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

मात्र दुसरीकडे सॅम करनचा भाऊ (Sam Curran Brother) टॉम करन (Tom Curran) याच्या हाती निराशा लागली. टॉम करन ७५ लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. परंतु त्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास दाखवला नाही. परिणामी तो अनसोल्ड राहिला.