मुंबईला अंडरवर्ल्डपासून कोणी वाचवलं ? मोदींचा व्हिडीओ शेअर करत मिटकरी यांचा भाजपवर पलटवार 

मुंबई – माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता.  शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी तसेच हिंदू मुस्लिम तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

निलेश राणे आणि  भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) या बंधुकडून जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे भाष्य केलं जात आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांकडे राणे बंधुंच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, आता याचसंदर्भातला एक व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला आहे.आपल्या ट्विटर हँडलवरून मिटकरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी भाषण करत आहेत आणि शरद पवार व्यासपीठावर उपस्थित आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मिटकरी म्हणतात, मुंबई ला दाऊद पासुन कुणी वाचवलं ऐका खुद्द मोदींच्या तोंडून…देवेंद्र फडणवीस व उर्वरीत गँग उत्तर देईल का?

या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, एक चांगले प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई जी आपली आर्थिक जीवनाला गती देणारी नगरी आहे. एक काळ असा होता की अंडरवर्ल्डने या मुंबईला उध्वस्त केलं. मुंबई अंडरवर्ल्डच्या ताब्यात गेली तर काय असा अंधःकार समोर होता. आणि मी सांगतो शरद पवार यांची हिंमत आणि कौशल्य होतं की त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं, बाहेर काढलं. हे त्यांचं सामर्थ्य होतं.