निलेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू आहे, ते काय आम्हाला शिकवणार?

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे भाजप (bjp) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप निलेश राणे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात. असं राणे यांनी म्हटले होते. दरम्यान, आता राणे यांच्या वक्तव्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, निलेश राणे हे कोण आहेत? हे निलेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार?’ अशा शब्दांत पाटलांनी राणेंवर टीका केली आहे. आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. फडणवीसांसोबत काही चुकीचे झाले असेल, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत असेल म्हणून ते आंदोलन करत आहे. आंदोलन करणे चुकीचे नाही, मात्र करण्यात येत असलेल्या आंदोलनाचा नागरिकांना त्रास व्हायला नको तसेच वाहने व नागरिकांना वेठीस धरू नये, असे मत पाटीलांनी व्यक्त केले.