पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधात पाण्याच्या प्रश्नासाठी मराठवाड्यातील हे मंत्री तोंड का उघडत नाहीत ? 

अंबाजोगाई  – मराठवाडा वॉटरग्रीड योजना कार्यान्वित झाली असती तर खर्‍या अर्थाने मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असता.पण,या भागातील आम जनता नेहमीच तहानलेली रहावी हा शाप पश्चिम महाराष्ट्रातील पुढार्‍यांनी डुख धरून दिलेला असल्याने मंजुर योजना रद्द करून टाकली.परिणामी जनतेच्या घशाला पाण्याचा घोट मिळू दिला नाही.जाहिर झालेल्या अर्थसंकल्पात एक रूपयाची तरतूद तर सोडा साधा उल्लेख ही केला नाही.एवढा अन्याय होवून मराठवाड्यातील एकही मंत्री या संदर्भात शब्द का काढत नाहीत ? असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी करीत बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,मंत्री  धनंजय मुंडे, अमित देशमुख, राजेश टोपे यांच्या अकार्यक्षमतेवरच ठपका ठेवला आहे.या मंडळींनी जनतेच्या दरबारात येवून योजनेबाबतचं उत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे त्यांनी म्हटले की,राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना मराठवाड्याची गरज लक्षात घेवून तथा शेतकरी आणि सामान्य जनतेच्या जीवनातील दुष्काळ कायमचा घालविण्यासाठी  वॉटरग्रीड योजना मंजुर केली.इस्त्रायल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीस हजार रूपयाची तरतूद करीत मंजुरी दिली होती.प्रत्यक्षात दहा हजार रूपये तरतुद ही झाली होती.खरे तर आत्तापर्यंत मराठवाड्यातील जनतेच्या घशापर्यंत आणि शेतकर्‍यांच्या शेतीच्या दारापर्यंत पाणी येवून पडले असते.योजनेचे एकूण स्वरूप आणि आराखडा पाहिल्यानंतर अत्यंत दुरदृष्टीने जनतेच्या हिताची योजना होती हे लक्षात येते.मात्र महाविकास आघाडीचे सरकार आले आणि पहिल्याच दणक्यात त्यांनी योजना बासनात गुंडाळून ठेवली.खरे तर राजकीय दुराग्रहापोटीच पश्चिम महाराष्ट्रातील काही पुढार्‍यांनी नेहमीच पाण्याच्या बाबतीत मराठवाड्यावर अन्याय केलेला आहे.त्या मागची कारणे ही वेगवेगळी असली तरी राजकीयदृष्ट्या या भागातील सामान्य जनता तहानलेलीच रहावी असा कयास सततचा राहिलेला आहे.

नुकत्याच जाहिर झालेल्या अर्थसंकल्पात दमडीची तरतूद योजनेसाठी केलेली नाही.साधा उल्लेखही कुठे नाही.वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात पाच ते सात मंत्री विभागातून आहेत.खरे तर अर्थसंकल्पापूर्वी या प्रश्नावर अगोदर उल्लेख केलेल्या मंत्र्यांनी आवाज उठविला असता तर कदाचित योजनेला बळकटी मिळाली असती.पण,ही सारी मंडळी कुणाच्या मुस्कटदाबीखाली काम करते हे आता लोकांना सांगण्याची गरज नाही.खरे तर ही योजना ठाकरे सरकारनेच बंद पाडली.उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी फाईल वर काढू दिली नाही.यावरूनच त्यांना मराठवाड्याविषयी किती प्रेम आहे हे दिसून येते.पण,याच मराठवाड्यातून मंत्री म्हणून जी मंडळी तिथे बसली आहेत तेच मंत्री योजनेबाबत एकही शब्द काढत नाहीत याचे मोठे नवल वाटते.उद्या या मंडळींना जनतेच्या दरबारात येवून वॉटरग्रीड योजनेबाबत खुलासा करावा लागणार आहे.कारण,आजही मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.जास्तीच्या पावसाने तळी भरली पण,योजना नसल्यामुळे घोटभर पाणी मिळत नाही.आगामी काळात जनतेच्या नाराजीचा सामना सत्ताधार्‍यांना निश्चितच करावा लागणार आहे असे या पत्रकाद्वारे भाजपा  प्रवक्ते कुलकर्णी यांनी म्हटले आहे.