बेळगाव ग्रामीणमध्ये भाजपला डोकेदुखी! निष्ठावंतांना डावलून लादलेला उमेदवार, नाराजीचा फटका बसणार?

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहे. दक्षिण भारतात भाजपची सत्ता असणारे हे एकमेव राज्य असल्याने पक्षासाठी ‘करो की मरो’ची परिस्थिती आहे. मतदानापूर्वी आलेल्या पोल्समध्ये भाजपच्या हातातून सत्ता निसटताना दिसत आहे. यामध्ये बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपला नाराजीचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी आणि कन्नड भाषिकांचा मतदारसंघ असणाऱ्या बेळगाव ग्रामीण मध्ये भाजपचे नागेश मनोळकर (Nagesh Manolkar) यांचा सामना काँग्रेसच्या विद्यमान आणि पॉवरफुल महिला नेत्या असणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी होत आहे. हेब्बाळकर यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या कामामुळे लोकांचा कल त्यांच्याकडे असल्याचं दिसून येतं आहे. निवडणुकीमध्ये त्यांची यंत्रणा देखील नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. दुसरीकडे उमेदवारी मिळवण्यापासून भाजपमध्ये असणारे कुरघोडीचे राजकारण अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे.

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निष्ठावंतांना डावलत भाजपने चार महिन्यांपासून पक्षात सक्रिय झालेल्या मनोळकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षासाठी जीवाचे रान करणारे  माजी आमदार संजय पाटील आणि कट्टर हिंदुत्ववादी नेते धनंजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. मनोळकर यांच्या प्रचारात या दोघांचे कार्यकर्ते असले तरीही ऐनवेळी ते नेमकी काय भूमिका घेतील हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मतदानाला अवघे ८ दिवस शिल्लक असताना देखील ही नाराजी कायम आहे. त्यामुळे याचा परिणाम मतदानावर दिसून येऊ शकतो.

मनोळकर,भाजप आणि माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या वेगवेगळ्या यंत्रणा काम करत असून या सर्वांमध्ये समन्वयाचा अभाव आहे.  भाजपच्या उमेदवाराकडून आरएसएस तसेच भाजपच्या जुन्या मंडळीना विश्वासात घेतले जात नसल्याचे चित्र देखील कायम आहे. त्यामुळे वरकरणी सर्व काही आलबेल असले तरी आतमध्ये विस्तव धगधगत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील तगडे आव्हान उभे केलं आहे. समितीचे उमेदवार चौगुले यांनी मराठी पट्यात प्रचारात आघाडी घेतलीय. त्यामुळे कन्नड भाषिक भागात काँग्रेस तर मराठी मतदारांचा कल एकीकरण समितीकडे जाताना दिसत आहे.