सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; दालनात घुसून आंदोलन

सोलापूर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर केतकी चितळेने ( Ketki Chitale ) आक्षेपार्ह पोस्ट केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केतकीच्या पोस्टचा तीव्र शब्दात विरोध केला जातोय. इतकचं नाही तर केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार करण्यात  आल्या असून पुणे, कळवा, गोरेगाव, बीड आणि उस्मानाबाद या ठिकाणीही गुन्हे दाखल झालेत. या पोस्टमुळे अभिनेत्रीला अटक देखील झाली आहे.

केतकीच्या या फेसबुक पोस्टने (Facebook Post) राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे.  एका बाजूला राजकारणातील दिग्गज नेते या कृत्याचा निषेध नोंदवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केतकी चितळे हिचे कौतुक केलंय. केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात (Court) तिने स्वत:ची बाजू मांडली.असं ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले,  तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले.  दरम्यान, केतकी चितळेला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले.