मंत्री अब्दुल सत्तार व आमदार रमेश बोरनारे यांना शिंदे-फडणवीस आताही पाठीशी घालणार का ?

मुंबई – टीईटी घोटाळ्याची (TET Scam) व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांच्या मुलीचेही प्रमाणपत्र बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात अशाप्रकारे किती जणांना अशा गैरमार्गाचा लाभ झाला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणाने टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांवर झालेला हा अन्याय आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. या भरती प्रक्रियेत राजकीय नेते, काही अधिकारी व पैसेवाल्यांनी लाभ मिळवला व मेहनती, गुणवंत विद्यार्थ्यांना डावलले गेले आहे. हे मोठे रॅकेट असून त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे त्यासाठी सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर गंभीर आरोप झाले असताना त्यांना मंत्रिमंत्रावर बसण्याचा काहीही अधिकार नाही. सत्तार व आमदार बोरनारे यांच्या कारवाई करणार का शिंदे-फडणवीस सरकार आताही त्यांना पाठीशी घालणार का ? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे.

शिक्षक पात्रतेसाठी राज्य सरकारने २०१३ पासून टीईटी परीक्षा लागू केली असून टीईटी पात्र असल्याशिवाय शिक्षक भरतीत सहभागी होता येत नाही. या परिक्षाही दरवर्षी घेतल्या जात नाहीत त्यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षक होण्यापासून वंचित राहिले आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत घोटाळा झाल्याचे सायबर पोलीसांनी उघड केले. या परिक्षेत पास करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दीड ते दोन लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा सर्व प्रकार प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे.

फडणवीस सरकारने टीईटीचे काम खाजगी कंपनीला दिले होते. शिक्षक भरती प्रमाणेच तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या नोकरभरतीतही घोटाला झाला होता. खाजगी कंपनीमार्फत ही प्रक्रिया राबवल्याने घोटाळा झाला आहे. मध्य प्रदेशातील ‘व्यापम’ घोटाळ्यासारखीच हा घोटाळा असून कोणालाही पाठीशी न घालता शिंदे फडणवीस सरकारने या घोटाळ्यातील दोषी व बोगस लाभार्थी यांच्यावर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले