बैलगाडा शर्यतवरील बंदी उठणार? सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

नवी दिल्ली- गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर (Maharashtra) चर्चेत असणाऱ्या बैलगाडा (BAILGADA-BULL RACE) शर्यतीवरील बंदीविषयी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने(Mumbai High court) बैलगाडा शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती.

बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गावच्या जत्रांमध्ये बैलगाडा शर्यतीचं आकर्षण असतं, त्यातून सर्वसामन्य शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांनाही रोजगार उपलब्ध होतो. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा असल्याने बैलगाडा शर्यत सुरु करावी अशा मागणीने जोर धरला होता.

विशेष म्हणजे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी झाली. ग्रामीण भागात अनेकदा आंदोलने झाली आहेत. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यती बंद झाल्या.

शर्यतीत बैलांना काठीने, चाबकाने अमानुष मारलं जातं, बॅटरीचा शॉक दिला जातो असे बैलांवर अनेक अत्याचार केले जातात, अशी तक्रार करत प्राणीमित्रांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यानंतर राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती.