पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागलेत तर भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे – पटोले 

पुणे –  भारतीय जनता पक्षाचे (BJP) मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून केला जात असलेला हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे स्वतःला राजा समजू लागलेत तर भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असा खोटा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतच महाराष्ट्राची बदनामी केली. कोरोना काळात भाजपाचे सरकार झोपले होते तर महाविकास आघाडीच्या सरकारनेच लोकांना आधार दिला, मदत पोहचवली. राज्यपाल, भाजपाचे मंत्री यांच्या माध्यमातून आपले महापुरुष व महाराष्ट्राची सातत्याने बदनामी केली. राहुलजी गांधी यांच्या बदनामीसाठी तर भाजपा व त्यांचा आयटी सेल कोट्यवधी रुपये खर्च करते पण राहुलजी त्याला घाबरले नाहीत.

भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार परवा म्हणाले की, राहुल गांधी व नरेंद्र मोदींमध्ये खूप फरक आहे, त्यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांचा समाचार घेत पटोले म्हणाले की, मुनगंटीवार खरे तेच बोलले. राहुलजी व मोदी यांची तुलना करताच येत नाही कारण राहुलजी गांधी देश जोडण्याचे काम करत आहेत तर नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करत आहेत, शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे काम करत आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर ३ हजार ५०० किमीची पदयात्रा काढली, जनतेच्या समस्या ऐकल्या, त्यांना धीर दिला, हिम्मत दिली. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून फक्त देशाची संपत्ती एक-एक करून विकून देश चालवत आहेत. संविधान व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहेत. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटत आहेत, छोटे व्यापारी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत. म्हणून राहुलजी गांधी व नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊच शकत नाही, असा टोला लगावला.

केंद्रातील भाजपाचे सरकार सामान्य जनतेच्या घामाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून जमा करते व उद्योगपती मित्रांचे कर्ज फेडते. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकतो, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देतो, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो अशी आश्वासने देऊन नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि नंतर तो निवडणुकीतला जुमला होता असे म्हणून जनतेच्या फसवणूक केली.