खराब फॉर्मशी झुंजत असलेले ‘हे’ दमदार खेळाडू IPL 2022 मध्ये दिसणार नाहीत?

नवी दिल्ली : आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. लवकरच खेळाडूंचा लिलाव देखील होणार आहे. मात्र भारताचे प्रतिनिधित्व केलेले अनेक दिग्गज खेळाडू अतिशय खराब फॉर्मशी झुंजत आहेत. याच कारणामुळे हे बलाढ्य खेळाडू पुढच्या मोसमात दिसणार की नाहीत याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

 दिनेश कार्तिक  

टीम इंडियाचा एकेकाळचा दिग्गज फलंदाज दिनेश कार्तिक सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. IPL 2021 मध्ये KKR कडून खेळताना दिनेशने 17 सामन्यात 223 धावा केल्या आहेत. संपूर्ण मोसमात धावा करण्याची त्याची तळमळ होती. कार्तिकने केकेआरचे कर्णधारपद अर्धवट सोडले होते जेणेकरून तो आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकेल, परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यामुळेच केकेआर संघाने यंदा त्याला कायम ठेवलेले नाही. कार्तिक टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे, पण आता तो 36 वर्षांचा आहे. या वयात अनेक क्रिकेटपटू निवृत्ती घेतात. अशा परिस्थितीत आयपीएल मेगा लिलावात कोणता संघ त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतो हे पाहणे महत्वाचे आहे.

सुरेश रैना

मिस्टर आयपीएल या नावाने प्रसिद्ध असलेला सुरेश रैना सुरुवातीपासूनच सीएसकेच्या संघाचा भाग आहे. आयपीएल 2021 मध्ये रैना त्याच्या लयीत अजिबात दिसला नाही. त्याची बॅट शांत राहिली. रैनाने आयपीएल 2021 च्या 12 सामन्यांमध्ये केवळ 160 धावा केल्या आहेत. गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत महेंद्रसिंग धोनीने त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही. त्याच्या वयाचा परिणाम त्याच्यावर दिसू लागला आहे. आता क्षेत्ररक्षणातही रैनाला चपळता दाखवता येत नाही. सीएसके संघाने त्याला यंदा रिटेन केले नाही.

केदार जाधव

केदार जाधव 2010 पासून आयपीएलचा भाग आहे. जाधवची आयपीएलमधील कामगिरी अत्यंत मध्यम स्वरूपाची होती. जाधव 2018 ते 2020 पर्यंत CSK कडून खेळला, त्यानंतर त्याला 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले, परंतु तो अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. IPL 2021 मध्ये जाधवने 6 सामन्यात केवळ 55 धावा केल्या आहेत. जाधवचे वयही वाढत आहे. अशा परिस्थितीत, त्याचे वय आणि 35 वर्षांचा फॉर्म लक्षात घेता, कोणताही संघ त्याच्यावर सट्टा  लावेल कि नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.