थोरात, शिंदे व भुजबळ यांनी घेतली राज्यपालांची भेट; जाणून घ्या काय म्हणाले राज्यपाल

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. खरतर मागील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकालात काढता आला असता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी फारसे उत्साही असल्याचे दिसून आले नाही. सोबतच कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर होते आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेतली तर काही दगाफटका होऊ शकतो अशी शंका आल्यानेच ती निवडणूक टळली.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या २७ डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, २८ डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडीकडून सुपुर्द करण्यात आला. काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज (रविवार)राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे पत्र देऊन, यासाठी विनंती केली.

याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, “विधानसभेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने राज्यपालांना दिलेला आहे. त्यांनी तो मान्य करावा ही विनंती करण्यासाठी आम्ही गेलो होतो. हा कार्यक्रम जाहीर करण्यास मान्यता द्यावी, अशी त्यांना विनंती केली आहे. त्यांनी बदलाबद्दल फार काही विचारणा केली नाही. आम्ही जे बदल केलेत ते लोकसभेत जी पद्धत आहे, तीच पद्धत आपण इथे विधानसभेसाठी केलेली आहे. आपली विधान परिषद देखील जवळपास तशाच पद्धतीने आहे. त्यामुळे आपण काही चुकीचं, वेगळं केलंय असं नाही. त्यांना केवळ काही अभ्यास करायचा आहे, काही माहिती घ्यायची आहे ती घेतो आणि मी कळवतो असं ते म्हणाले आहेत. राज्यपाल मान्यता देतील याची आम्हाला खात्री आहे.”