‘मी रात्री बारा वाजता अमित शाहांना फोन केला, सांगितलं अटक करा, झुकेगा नहीं’ 

पुणे – केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा सातत्याने महाविकास आघाडीचे नेते आरोप करत असतात. आता खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा याच मुद्यावर भाष्य केले आहे. या धडींना आपण घाबरत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपल्या नातेवाईकांच्या घरी जेव्हा ईडीने धाड टाकली त्या रात्री आपण दिल्लीत होतो. धाडीच्या दिवशी रात्री बारा वाजता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. त्यांना सांगितलं, मी दिल्लीत आहे. अटक करा. मी घाबरत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पुण्यात बोलताना ते म्हणाले,  आमचेही दिवस येतील. लोकशाही आहे. समोर लोक बसले आहेत. 2024 मध्ये त्याचं उत्तर मिळेल.  ईडीच्या धाडीच्या त्रासाबाबत बोलताना ते म्हणाले, त्रास म्हटला तर होतो. पण आपण त्रास करुन घ्यायचा नाही. जे होणारच आहे, आपल्यामागे ससेमिरा लावणारच आहे. एकदा कळल्यावर त्रास कशा करता करुन घ्यायचा?

आता माझ्यासारख्या माणसाची नसलेली प्रॉपर्टी जप्त केली. मी ज्या घरात राहतो ते घर, आणि माझी वडिलोपार्जित 40-45 गुंठे जमीन आहे. कोणतीही नोटीस न देता जप्त केली. आणि रोज अटक करा. मी निरोप दिला,अरे मी बसलोय, कधी अटक करणार? ज्यादिवशी माझ्या जवळच्या लोकांवर धाडी पडल्या, त्यादिवशी मी रात्री बारा वाजता दिल्लीत अमित शाहांना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं, मी दिल्लीमध्ये बसलेलो आहे. माझ्यासाठी गरिबांना का त्रास देत आहात? मी बसलेलो आहे. मला अटक करा. आम्ही घाबरत नाहीत. पुष्पा चित्रपटातला डायलॉग आहे ना. झुकेंगा नहीं. असं संजय राऊत  म्हणाले.