Women’s Day Special : तिर्थरुप आईस साष्टांग दंडवत…!

धनंजय भगत : आई शब्दांत आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आहे. दोन मुळाक्षरांनी बनलेल्या या शब्दात आपलं सारं विश्व सामावलेलं आहे… शाळेत आपल्याला हे सांगितलं जायचं तेव्हा आपण ऐकायचो आणि सोडून द्यायचो पण मी जसजसा मोठा होत गेलो आणि माझी ती मर्दानी ज्या प्रकारे लढली तो प्रसंग मी खाली सांगत आहे. म्हणजे तुम्हालाही कळेल त्या दोन शब्दाची ताकद.. अजूनही मला ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो. तशी वेळ कोणत्याही माणसावर खरं तर येऊ नये. कळत नाही की सुरुवात कुठुन आणि कशी करावी… आयुष्याचा प्रवास शब्दांत कसा मांडता येईल.. पण तरी मी प्रयत्न करतो..

मला आठवतंय आम्ही लहान होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. सगळं कसं छान सुरु होत… पण, असं म्हणतात की सटवाईनं जे आपल्या पाट्यावर पुजलेलं असतं ते घडतच असतं. तसंच आमच्या बाबतीत घडलं. त्या दिवसाची सकाळ आमचं नशीब फिरवणारी होती. त्या दिवशी आमच्या नशिबात खूप भयंकर असं काहीतरी लिहून ठेवलं होतं. पप्पा मार्केटयार्ड मध्ये कामाला होते. नेहमीप्रमाणे ते कामाला गेले आणि काम करत असताना पप्पांच्या डोक्यामध्ये एक बार शिरला आणि ती जखम एवढी खोलवर होती की त्यामुळं त्यांना ब्रेनट्युमर झाला. आणि मग त्यांना एस एन डी टी जवळच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. खूप गोष्टी घडल्या… पप्पा कोमात गेले. कोमातून बाहेर आल्यानंतर आम्हाला कोणालाही ते ओळखत नव्हते. अजूनही मी त्या हॉस्पिटलजवळून गेलो तरी मला ते भयान प्रसंग डोळ्यासमोर येतात. खरं तर तेव्हा आम्हाला खरी नाती कळाली..

माझी आई तशी हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील, लग्नानंतर ती एका शेतकरी आणि कामगार कुटुंबात गेली, असही नाही की तिला तिच्या सासरी काही मिळालं नव्हतं, माझ्या आजोबांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचा तिला फक्त कागदोपत्री आधार होता. तो कागदोपत्री आधार आम्हाला आमच्या संकटाच्या काळामध्ये कधीच कामाला आला नाही. जवळ सगळं काही असताना देखील तिला माझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैसे उभे करता आले नाहीत.. अशा संकटाच्या वेळेतही तिला तिच्या सासरच्या काही महिलांनी खच्चीकरण करण्याचं काम केलं.. तर त्यात काही जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी अशा होत्या ज्यांनी तिला मानसिक आधारासोबत आर्थिक बळही दिले त्यामुळे त्या संकटकाळात ती कधीही एकटी पडली नाही.. शेवटी ते बोलतात ना ज्याचं कोण नसतं त्याचा देव असतो. तर, तो देव माणसांच्या रुपात आमच्या मदतीला धावून आला. तो पहिला माणूस म्हणजे केळेवाडीतील आई, मुंबईची आई, आशा मावशी, अक्का मावशी, सविता ताई, कविता ताई त्या आमच्या पाठीशी खंबीर पणे उभ्या राहिल्या. आईच्या प्रत्येक संकटात त्या तिच्या सोबत राहिल्या.

दवाखान्याला खूप खर्च झाला होता. डॉक्टर तर बोलले होते आता त्यांना देवच वाचवू शकतो पण माझी आई काय हिम्मत हारली नाही. ती लढत राहिली आणि अखेर देवाला पण तिच्या प्रयत्नांची दखल घ्यावी लागली. मग भेटला दुसरा देव माणूस… डॉ. हेमंत चांदोरकर… त्यांनी सुद्धा आईला खूप मदत केली. पाच वर्षे पप्पांचे दर महिन्याला असणारे चेकअप त्यांनी मोफत करुन दिले. आईची जिद्द आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे माझे पप्पा बरे झाले. पण तोपर्यंत होतं नव्हतं ते सगळं त्यांच्या उपचाराला खर्ची झालं होतं.

आता कुटुंबप्रमुख म्हणून संसाराचा सगळा भार आईनं स्वतःच्या खांद्यावर घेतला. आईने माझं आणि ताईचं शिक्षण पूर्ण केलं. एकदम हलाखीच्या परिस्थितीत आम्हाला मोठं केलं. आम्हाला कधीही काही कमी पडू दिलं नाही. यामुळंच माझ्या आईचा मला सार्थ अभिमान वाटतो…

असं म्हणतात की पुरुष हा कुटुंबाचा पाया असतो. परंतु, माझ्या कुटुंबाचा गाडा माझ्या आईनंच ओढला. जेव्हा पण मला कधी निराश किंवा हरल्यासारखं वाटतं तेव्हा मी माझ्या आईला पाहतो… तिनं केलेला संघर्ष आठवतो… मला तिचा हा संघर्ष नेहमीच प्रेरणा देत राहतो व भविष्यातही देत राहील… माझी मर्दानी आई लढली आणि जिंकलीय. धन्य ती माता जिनं अशा लेकीला जन्म दिला.

आजच्या महिला दिनी माझ्या आईसारख्या लढणाऱ्या तमाम महिलांना माझा मानाचा मुजरा !