‘येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची काही आपल्या नशिबी येणार नाही’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर होते. शरद पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं. संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही,ते कुठेही राजकारण करतात. निवणडणूक लागायाच्या अगोदर, निकाला आधीच मी येणार असं सांगत होते, पण आम्ही येऊ दिले नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले,गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातील जनतेची साथ आणि शक्ती मला मिळाली आहे. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभेत 52 वर्षांपासून तुम्ही मला निवडून दिलं आहे. चार वेळा मला जनतेने मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. जनतेने मला खूप दिलं आहे. अजूनही तुमची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उस्मानाबाद येथे व्यक्त केला.

शरद पवार यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की असल्याचं ट्विट करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सदाभाऊ खोत यांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.