बीडच्या अविनाश साबळेचा अमेरिकेत जलवा; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत इतिहास घडवण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली- अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) अविनाश साबळेनं (Avinash Sable) फायनलमध्ये धडक मारली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अविनाशनं 3 हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये (Steeplechase) फायनल गाठली आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या अविनाशनं 8 मिनिटं आणि 18.75 सेकंद वेळ घेत तिसरा क्रमांक पटकावत फायनल गाठली आहे. फायनलमध्येही त्यानं याच पद्धतीची सर्वोत्तम कामगिरी केल्यास तो पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करू शकतो.

भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने ( Anju Bobby George ) पॅरीस येथे २००३ साली पार पडलेल्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आणि त्याआधी भारताच्या एकाही खेळाडूला World Athletics Championships स्पर्धेत पदक पटकावता आलेले नव्हते. यंदा हा दुष्काळ संपेल अशी आशा आहे.

महाराष्ट्राचा अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर अविनाश घरी परतला असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. पण, त्यातून सावरत पुन्हा मेहनत करत तो मैदानावर परतला. जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाश इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.