WPL Auction Live: आरसीबीची चपळ बोली! ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज अष्टपैलू एलिसा पेरीला ‘इतक्या’ कोटींना घेतले विकत

WPL Auction 2023 Live Updates: बहुप्रतिक्षित महिला आयपीएल २०२३ चा (WPL 2023) लिलाव मुंबईत दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयपीएल लिलाव (WPL Auction) होत आहे. मल्लिका सागर अडवाणी या लिलावकर्ता असून एकूण ४०९ खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले गेले आहे. त्यांपैकी केवळ ९० खेळाडूंना ५ फ्रँचायझींद्वारे विकत घेतले जाईल.

महिला आयपीएलच्या लिलावातील बहुचर्चित नावांपैकी एक एलिसा पेरी (Ellyse Perry) हिच्यावर अपेक्षेप्रमाणे मोठी बोली लागली. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिसा पेरी सर्वाधिक मूळ किंमतीसह अर्थातच ५० लाखांसह लिलावात उतरली होती. वनडे आणि टी२० क्रिकेटमधील एलिसाच्या प्रदर्शनामुळे तिला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तिला विकत घेण्यासाठी प्रयत्नशील दिसले. अखेर बेंगलोर संघाने बाजी मारत १.७ कोटींना तिला विकत घेतले. 

अशाप्रकारे स्म्रीती मंधानाबरोबरच एक मोठी खेळाडू बेंगलोर संघाच्या ताफ्यात सामील झाली. बेंगलोरने भारताची धडाकेबाज सलामीवीर स्म्रीती मंधानाला ३.४ कोटींसह विकत घेतले. शिवाय न्यूझीलंडची स्टार क्रिकेटपटू सोफी डिवायन हिलाही बेंगलोरने मूळ किंमतीला (५० लाख) विकत घेतले आहे.