मासिक पाळीवेळी पगारी सुट्टीची गरज नाही म्हणणाऱ्या स्मृती इराणींना कंगनाचा पाठींबा, म्हणाली…

Smriti Irani on Menstrual leave: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीदरम्यान महिलांसाठी सुट्टीवर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, मासिक रजेमुळे (Periods Leave) कर्मचाऱ्यांमध्ये महिलांसोबत भेदभाव होऊ शकतो. स्मृती इराणी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात या गोष्टी सांगितल्या ज्यात सरकार मासिक रजेसाठी कोणताही कायदा करण्याचा विचार करत आहे का? असे विचारण्यात आले होते.

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, “आज महिला अधिकाधिक आर्थिक संधींचा पर्याय निवडत आहेत हे लक्षात घेऊन मी यावर माझे वैयक्तिक मत देईन. आम्ही असे मुद्दे मांडू नयेत जिथे महिलांना समान संधी नाकारल्या जातात.” इराणी म्हणाल्या की, “मी स्वतः एक महिला आहे. म्हणूनच मला असे म्हणायचे आहे की मासिक पाळी हा अडथळा नाही. हा स्त्रीच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. हे कोणतंही अपंगत्व नाही. मासिक पाळीकडे अपंगत्व म्हणून पाहू नये. महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिलं जाईल.”

आता स्मृती इराणी यांच्या या वक्तव्याला अभिनेत्री कंगना राणौतने पाठींबा दिला आहे. कंगना राणौत म्हणाली, “कामगार महिला हा शब्दच मुळात खोटा आहे, भारतात आतापर्यंतच्या मानवी इतिहासात एकही काम न करणारी महिला आढळली नाही. शेतात काम करण्यापासून ते घर सांभाळण्यापर्यंत आणि मुलांचे संगोपन करण्यापर्यंत महिला नेहमीच काम करत आल्या आहेत. या काळात कुटुंब, समाज किंवा देशाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणीही आडकाठी आणली नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “जोपर्यंत ही एक विशेष वैद्यकीय स्थिती नसेल, तोपर्यंत महिलांना त्यांच्या मासिक पाळीसाठी पगारी रजेची गरज नसते. कृपया समजून घ्या, ही केवळ मासिक पाळी आहे, आजार किंवा अडथळा नाही.”

महत्वाच्या बातम्या-