WPL Auction Live: अंबानींच्या मुंबई इंडियन्सने मारला डाव, कर्णधार हरमनप्रीतला १.८ कोटींना घेतले विकत

WPL Auction 2023 Live Updates: बहुप्रतिक्षित महिला आयपीएल २०२३ चा (WPL 2023) लिलाव मुंबईत दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयपीएल लिलाव (WPL Auction) होत आहे. मल्लिका सागर अडवाणी या लिलावकर्ता असून एकूण ४०९ खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले गेले आहे. त्यांपैकी केवळ ९० खेळाडूंना ५ फ्रँचायझींद्वारे विकत घेतले जाईल.

लिलावात ५० लाखांच्या मूळ किंमतीसह उतरलेल्या भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला विकत घेण्यासाठी ३ संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघांनी हरमनप्रीतवर बोली लावल्या. पुढे मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत उडी घेतली आणि हरमनप्रीतची किंमत १.५ कोटींच्या पुढे गेली. अखेर मुंबईने १.८ कोटींच्या किंमतीला हरमनप्रीतला ताफ्यात घेतले. 

हरमनप्रीतपूर्वी भारताची धडाकेबाज सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिच्यावरही मोठी बोली लागली. बेंगलोर संघाने ३.४ कोटी मोजत स्म्रीतीला विकत घेतले आहे.

दरम्यान महिला आयपीएल लिलावासाठी ४०९ खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले गेले आहे. त्यांपैकी केवळ ९० खेळाडूंना ५ फ्रँचायझींद्वारे विकत घेतले जाईल. लिलावात सहभागी झालेल्या ४०९ खेळाडूंपैकी २४६ भारतीय खेळाडू आणि १६३ परदेशी खेळाडू आहेत. सहयोगी देशांच्या ८ खेळाडू या लिलावाचा भाग आहेत. महिला आयपीएलच्या पाचही संघांना किमान १५ खेळाडूंना संघात ठेवावे लागणार आहे. लिलावात फ्रँचायझीला १२ कोटींपैकी किमान ९ कोटी रुपये खर्च करावे लागतील. सर्व फ्रँचायझींना ६ परदेशी खेळाडू विकत घेण्याचा अधिकार असेल.