सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी (Sonia Gandhi) यांच्या बेकायदेशीर ईडीच्या (ED) चौकशी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करून केंद्र सरकारचा (Central Govt) कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे (Shivraj More) व पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट (Rahul Shirsat) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे (Prathamesh Abnave), पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले (Kaustubh Navale), प्रदेश चिटणीस अनिकेत नवले, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, स्वप्नील नाईक, राजू ठोंबरे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय माने, प्रसाद वाघमारे, शालू चलवादी, सद्दाम शेख, रुपेश कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवराज मोरे म्हणाले, सोनिया गांधी यांनी देशातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी कार्य केले आहे. अशा सोनियाजींना ईडीच्या माध्यमातून मानसिक त्रास देण्याचा, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. या बेकायदेशीर चौकशीचा युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो. सोनिया गांधींच्या समर्थनार्थ देशभर आंदोलन केले जाणार असून, हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.असं ते म्हणाले.