“बळीराजाला चांगले दिवस येऊदेत, राज्यात पाऊस चांगला पडूदे”, मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. आषाढी एकादशीनिमित्त आपल्याला सहकुटुंब, शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मिळालं. त्यासाठी आपण स्वत:ला भाग्यवान समजतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे, असे शासकीय महापूजेनंतर सत्कार सोहळ्याला संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे शासकीय महापूजा झाल्यानंतर तुम्ही विठुरायाकडे काय मागणं मागितलंत असा प्रश्न मला पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता विठुरायाकडे काय मागणार, बळीराजाला चांगले दिवस येऊदेत, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊदेत. राज्यात पाऊस चांगला पडू दे. हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे. राज्यातील सर्व घटक सुखी समाधानी झाले पाहिजे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत हाच आपला उद्देश आहे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस येऊ देत हेच मागणं मी विठुरायाकडे मागितलं, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.