स्टुअर्ट ब्रॉड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, युवराज सिंगने पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि स्टुअर्ट ब्रॉडची (Stuart Broad) कहाणी कोणाला माहीत नसेल. टी20 विश्वचषक 2007 मध्ये युवीने ब्रॉडच्या 6 चेंडूत सलग 6 षटकार मारून इतिहास रचला होता. युवराज आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर युवीने ब्रॉडच्या गोलंदाजीवर आपला राग काढला होता.

मात्र, युवीने सामना जिंकल्यानंतर आणि त्यानंतर अनेक वर्षांनी ब्रॉडचे कौतुक केले होते. तेव्हा केवळ 21 वर्षांचा असलेला ब्रॉड आज जगातील सर्वोत्तम गोलंदाज बनून मैदानातून निरोप घेत आहे. त्याने अॅशेस दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Stuart Broad Retirement) जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत त्याचा जुना प्रतिस्पर्धी आणि मित्र युवराज सिंगने ट्विट करून त्याला निरोप दिला आहे.

युवीने ट्विट करून म्हटले, अविश्वसनीय कसोटी कारकीर्दीबद्दल स्टुअर्ट ब्रॉडचे अभिनंदन. सर्वोत्तम आणि सर्वात धोकादायक लाल बॉल गोलंदाजांपैकी एक आणि खरा लिजेंड. तुमचा प्रवास आणि जिद्द खूप प्रेरणादायी आहे. ब्रॉडच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!