काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर – नाना पटोले

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

निवडणूक निकालावर प्रतिक्रीया देताना पटोले म्हणाले की, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्वाचा असतो, आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करु शकलो. काँग्रेस पक्षाने स्वंतत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला परंतु मागील काही वर्षात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाची धोरणे ही शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, बहुजनविरोधी आणि देश विकायला निघालेली आहेत आणि याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो, संविधान, लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करु शकतो ही जनतेची धारणा आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. या यशाबद्दल पटोले यांनी राज्यातील जनता व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.

नागपूरमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री, आरएसएसचे मुख्यालय आहे, तेथे भाजपाला काँग्रेसने धोबीपछाड दिलेली आहे. पंचायत समित्यांमध्येही काँग्रेस पक्षच सरस ठरला आहे. केंद्रातील सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. नैसर्गिक संकट आलेले असताना गुजरातला एक हजार कोटी रुपये दिले जातात पण महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली जातात हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. आजचे यश हे कार्यकर्त्यांचे यश आहे, जनतेनेही काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरुन आशिर्वाद दिला आहे.

या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची आणखी उर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला होता त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला माननारा मोठा वर्ग आहे. राज्यात व केंद्रात काँग्रेस हाच पर्याय आहे. काही लोक काँग्रेसला संपवायचा विचार सातत्याने करत असतात त्यांना जनतेने या निकालातून चोख उत्तर दिलेले आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

हे ही पहा: