‘१० टक्के पुरावेच बाहेर आलेत, ९० टक्के बाकीच; फडणवीस उद्या नवा व्हीडिओ बॉम्ब टाकणार’

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे भाजप (bjp) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती अजूनही १० टक्के पुरावेच लागले आहेत, ९० टक्के पुरावे अजून बाहेर यायचे आहेत, असे वक्तव्य पाटील यांनी केले. ते रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सोमवारी विधानसभेत आणखी एक व्हीडिओ बॉम्ब टाकणार आहेत. एकाच व्हीडिओ बॉम्बने सगळेजण इतके चिडीचूप झाले आहेत. मग दुसरा बॉम्ब टाकल्यावर काय होईल? दुसरा व्हीडिओ बॉम्ब आणखी शक्तिशाली आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.