मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील  २०४.५९ किमींच्या रस्त्यांची कामे होणार पूर्ण 

नागपूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येणाऱ्या नागपूर विभागातील  २०४.५९ किमींच्या रस्त्यांची कामे जलद गतीने होणार असून, त्यासाठी साधारणतः १५७ कोटी ६० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याचे हे यश मानले जात आहे.

विभागात येणाऱ्या नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतील रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करण्यात आला होता. परंतु त्याचे पुढे काहीच झाले नसल्याने आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिषदेत हा मुद्दा उचलून धरला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्यांचे बांधकाम एडीबी योजनेच्या अंतर्गतच होणार असून, कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी येथील रस्त्यासाठी १३ कोटी ५० लाख, भंडारा जिल्ह्यात तुमसर, पवनी, लाखांदूर व साकोली या गावांसाठी १६ कोटी ७१ लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी आणि सावली गावासाठी ६ कोटी २६ लाख, गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, कोरची, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली, चामोर्शी आणि धानोरासाठी ९७ कोटी ४० लाख निधी तर नागपूर जिल्ह्यातील सावनेर, हिंगणा, उमरेड, कुही आणि भिवापूरसाठी २३ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिली.

पावसाळ्यात या मार्गांची होणारी दुरवस्था व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्याचे बांधकाम जलद गतीने व्हावे अशी विनंती यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळेंनी हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.