रामदास आठवले यांच्या सभांची मागणी वाढली; युपी विधानसभा निवडणुकीत आठवले ठरले स्टार प्रचारक

मुंबई  – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज दि. 3 मार्च रोजी सकाळी वाराणसी येथे रवाना होत असून आज दि.3 आणि उद्या दि.4 मार्च रोजी दोन दिवस उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत वाराणसी येथे मित्रपक्ष भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष भाजपच्या उमेद्वारांकडून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्या सभांची मागणी वाढत आहे. रामदास आठवले हे उत्तर प्रदेशात स्टार प्रचारक ठरले आहेत. भाजप उमेदवार आपल्या प्रचार सभांसाठी रामदास आठवले यांना पसंती देत आहेत.त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील सर्व टप्प्यांमध्ये रामदास आठवले यांना जाहीर सभांसाठी भाजप कडून निमंत्रित करण्यात येत होते.

उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुकीत आता पर्यंत लखनौ, प्रयागराज,गोरखपूर आदी अनेक जिल्ह्यांत ना.रामदास आठवले यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक जाहीर सभा आणि पदयात्रा केल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे संपूर्ण उत्तर प्रदेशात प्रत्येक जिल्ह्यात संघटन आहे.रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप ला बहूमत निश्चित प्राप्त होणार असल्याचा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

आज वाराणसी येथे सकाळी पिंडरा विधानसभा चे भाजप चे उमेदवार डॉ .अवधेश सिंग यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस रामदास आठवले संबोधित करतील.प्रचार यात्रा करतील. त्यानंतर रामदास आठवले हे आझमगढ येथील लालगंज येथे जाहीर निवडणूक प्रचार सभेस संबोधित करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.4 मार्च रोजी वाराणसी जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचारसभा आणि प्रचारयात्रा पदयात्रा करतील. असे रिपाइं तर्फे कळविण्यात आले आहे.