‘द केरला स्टोरी’नंतर ‘७२ हुरे’चा वाद; जिहाद आणि दहशतवादाचे काळे सत्य सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर रीलिज

‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’नंतर आता आणखी एक चित्रपट जिहाद आणि दहशतवादाचे काळे सत्य समोर आणणार आहे. आम्ही बोलतोय, गुलाब तन्वर निर्मित आणि अशोक पंडित सह-निर्माता असलेल्या ‘७२ हुरे’ सिनेमाबद्दल. संजय पूरण सिंह चौहान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, ज्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपट ‘लाहोर’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रविवारी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, जो जोरदार धमाकेदार आहे.

अशोक पंडित यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला
चित्रपटाचे सह-निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर ७२ हुरेचा (72 Hoorain) फर्स्ट लूक टीझर शेअर केला आणि लिहिले, “आश्वासन दिल्याप्रमाणे, आमच्या ‘७२ हुरे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक येथे आहे. मला खात्री आहे की तुम्हाला तो आवडेल.” पंडित यांनी पुढे लिहिले की, “जर तुम्ही दहशतवाद्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ७२ कुमारी हुरांना भेटण्याऐवजी तुम्ही क्रूरपणे मरण पत्करत असाल तर काय होईल. हा माझा आगामी चित्रपट ‘७२ हुरे’चा फर्स्ट लूक आहे. हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी रिलीज होणार आहे.”

टीझरमध्ये काय दाखवले आहे?
टीझरमध्ये २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्याचा दोषी ओसामा बिन लादेन, २०११ मध्ये मुंबईतील हॉटेल ताजवरील हल्ल्याचा आरोपी अजमल कसाब, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन, १९९९च्या दिल्ली विमान अपहरणामध्ये अझहर, २००६च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी हाफिज सईद तसेच दहशतवादी सादिक सईद, बिलाल अहमद आणि हकीम अली यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आणि ७२ हुरोंच्या लोभापायी या सर्वांनी दहशतीचा मार्ग पत्करल्याचे सांगण्यात आले आहे.

पार्श्‍वभूमीवर दहशतवाद्याच्या सूत्रधाराची भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याचा आवाजही ऐकू येतो, “तुम्ही निवडलेला जिहादचा मार्ग तुम्हाला थेट जन्नतपर्यंत घेऊन जाईल, जिथे कुमारिका, कोणीही स्पर्श न केलेल्या हुरे कायमच्या तुमच्या असतील.”