ललित पाटील प्रकरणात डाॅ. समीर देवकाते गजाआड; पुण्यात खळबळ 

Sameer Deokate –  अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात ससून रूग्णालयातील (Sasun Hospital) वैद्यकीय अधिकारी डाॅ. समीर देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील डाॅ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील डाॅ. देवकाते यांना अटक करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

डॉ. देवकाते हे ऑर्थोपेडिक्स स्पेशालिस्ट आहे. ललित पाटीलला ऑर्थोपेडिक्स संदर्भातील कोणतेही दुखणे नसताना, तो तब्बल दोन महिने डॉ. देवकाते यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होता. तसेच डॉ. देवकाते हे ललित पाटीलचा भाऊ भुषण पाटील आणि मित्र अभिषेक बलकवडे यांच्या कारण नसताना माेबाईलद्वारे संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे.

याप्रकरणी ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण दादासाहेब देवकाते ( ४०) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. देवकाते यांना सोमवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. चाकण येथे मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. आजारी असल्याचा बहाणा करुन ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. ललित ससूनमध्ये उपचार घेत असताना ललित, साथीदार अरविंदकुमार लोहरे, त्याचा भाऊ भूषण, अभिषेक बलकवडे यांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात मेफेड्रोनची निर्मिती करण्यासाठी कारखाना सुरू केला होता.ससून रूग्णालयातून ललित मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी ससून परिसरात कारवाई करुन ललितच्या दोन साथीदारांना पकडले होते. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ललित २ ऑक्टोबर रोजी ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षात (वाॅर्ड क्रमांक १६) बंदाेबस्तास असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता.

पाेलीसांकडून  ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते, येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अटक करण्यात आली. तपासात डाॅ. मरसाळे यांनी ललितला ससून रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्याचे पत्र दिल्याचे निष्पन्न झाले. डाॅ. मरसाळे यांनी ललितकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना सोमवारी अटक करण्यात आली. तर दुसरीकडे डॉ.देवकाते यांच्याविरुध्दही सबळ पुरावे मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी भादवि कलम २२३,२२४, २२५, १२० (ब), २०१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? शाह म्हणाले….

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास