वंदे भारत एक्सप्रेसला धडकलेल्या म्हशींच्या मालकावर गुन्हा दाखल

मुंबई – पंतप्रधान(Prime minister) नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी 30 सप्टेंबर रोजी गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या(Vande Bharat Express Train) नवीन सुधारित आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला होता. देशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे.मात्र आता ही एक्स्प्रेस आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चे आली आहे. गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी म्हशींच्या कळपाची आणि वंदे भारत एक्स्प्रेसची धडक झाली. यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसने धडक दिलेल्या म्हशींच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस या म्हशीच्या मालकांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांची मदत घेत आहेत.

या अपघातात ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. हा अपघात गैरतपूर आणि वाटवा स्थानकादरम्यान झाला. एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर स्थानकांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारी सकाळी मुंबईहून निघाली होती. रात्री 11.15 च्या सुमारास रुळावर आलेल्या काही म्हशींना रेल्वेने धडक दिली. पश्चिम रेल्वेचे अहमदाबाद विभागीय रेल्वेचे प्रवक्ते जितेंद्र कुमार जयंत यांनी सांगितले की, आरपीएफने म्हशींच्या मालकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मात्र, मालकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेनचा खराब झालेला भाग दुरुस्त करून ट्रेन गांधीनगर स्थानकावर पाठवण्यात आली आहे. गाडी आपल्या नियोजित वेळेवर गांधीनगर स्थानकावरून मुंबईकडे रवाना झाली. या घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही. ट्रेनच्या इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. रेल्वे जवळच्या गावकऱ्यांना रुळाजवळ गुरे सोडू नका असा सल्ला देत आहे.