या खोके सरकारचं लक्ष उद्योग धंद्यांकडे नाही तर फक्त त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे – ठाकरे

पुणे – वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यावरून राजकारण पेटल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्नात तळेगावमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर टिका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की,  गुजरातपेक्षा दहा हजार कोटी रूपयांची जास्त सबसीडी आपण देणार होतो. शिवाय आता गुजरातमध्ये हा प्रकल्प बनत आहे त्यापेक्षा जास्त सुविधा महाविकास आघाडी सरकारने दिल्या होत्या. तरी देखील हा प्रकल्प गुजरातला गेला. आपल्या मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हतं की, फॉक्सकॉन प्रकल्प काय आहे आणि तो कोठून आलाय. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा फायदा घेत गुजरातनं हा प्रकल्प आपल्या राज्यात नेला. हा प्रकल्प गुजरातला गेला यात गुजरातचा आणि केंद्राचा दोष नाही तर राज्य सरकारच्या ना कर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला, अशी टीका आदित्य टाकरे यांनी यावेळी शिंदे सरकारवर केली.

“प्रकल्पावर आम्ही बोलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र रोष दिसून येत आहे, दु:ख आहे. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. वेदान्त-फॉक्सकॉन, बल ट्रक पार्क आणि मेडिसिन डिव्हाईस पास्क हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे. या खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय याकडे कुणाचंच लक्ष नाहीये”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.