दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही- संजय राऊत

नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असून नुकताच कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारला लगावला आहे.

याबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कान टोचले आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढ पणा आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.