आप नेते संदीप भारद्वाज यांची आत्महत्या, MCD निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने होते नाराज

दिल्ली: आम आदमी पार्टीच्या (आप) ट्रेड विंगचे प्रदेश सचिव संदीप भारद्वाज (Sandeep Bhardwaj) यांनी गुरुवारी (२४ नोव्हेंबर) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ते ५५ वर्षांचे होते. अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून सीआरपीसी कलम १७४ अन्वये चौकशी सुरू आहे. घटनास्थळावर सुसाईड नोटही सापडलेली नाही. आत्महत्येपूर्वी संदीप भारद्वाज दोन दिवसांपासून घराबाहेर पडले नव्हते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भारद्वाज हे आप ट्रेड विंग दिल्लीचे सचिव होते आणि राजौरी गार्डनमधील भारद्वाज मार्बल्सचे मालक होते. पश्चिम जिल्ह्याचे डीसीपी घनश्याम बन्सल यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी ४.४० च्या सुमारास पोलिसांना संदीप भारद्वाज यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

नातेवाइकांनी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सांगितले की, संदीप जेवण करून वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत गेले होते. बराच वेळ होऊनही ते खाली न आल्याने घरचे त्यांना पाहायला वरच्या खोलीत गेले आणि त्यांनी संदीप यांना खोलीतील पंख्याला लटकलेले पाहिले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एमसीडी निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होते
संदीप भारद्वाज यांच्या एका मित्राने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘एक कारण हे देखील असू शकते की ते बराच काळ निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून ते त्यांच्याशी संबंधित होते. ते तेथील आमदार शिवचरण यांचे काम पाहत असत. त्यांना पक्षाने आश्वासन दिले होते, पण तिकीट मिळाले नाही. त्यांना हा धक्का सहन झाला नसावा. कदाचित त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी.